बंगाली नव वर्षाचे स्वागत
“एशो हे बैशाक एशो एशो”
मागच्याच महिन्यात गुढी पाडवा
झाला. मस्त श्रीखंड – पुरी, भरली वांगी चा
बेत केला होता आणि सगळ्यांनी चांगलाच आडवा हात मारला होता. पण ते खाऊन जिरतेय ना जिरतेय तोवर घरात लगेचच पुढल्या
सणाची – म्हणजे त्यानिमित्ताने होणाऱ्या खाण्यापिण्याची चर्चा सुरु झालीच आणि त्यात
येणारा सण म्हणजे बंगाली नव वर्ष - पोईला
बैशाक!
उद्या १४ एप्रिल - पोईला
बैशाक! पोईला म्हणजे – पहिला आणि बैशाक म्हणजे
वैशाख. मराठी नववर्ष जसे चैत्र
महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरु होते तसे बंगाली नवीन वर्ष वैशाख महिन्याच्या पहिल्या
दिवशी सुरु होते. साधारणपणे १४ किवा १५
एप्रिल ला बंगाली नव वर्ष लागते.
माझ्या सासुबाई होत्या तोवर
आमच्याकडे पोईला बैशाक सुरु व्हायचा तो
तुळशीला पाणी देवून. सकाळी लवकर उठून घराची साफ सफाई झाली कि त्या स्नान करीत व मग
अल्पना – म्हणजे बंगाली रांगोळी काढीत. मग घरातल्या तुळशीवर एक घट बांधून त्यातून तुळशीवर
अभिषेक करीत. पूर्ण वैशाख महिन्यात हा घट तुळशीवर बांधलेला असे. त्यानंतर मग पूर्ण
सोपस्कार करून देवाची पूजा - त्यातही देवी लक्ष्मीला आणि गणपतीला स्पेशल मान
असे. सर्वांच्या सुख समृद्धीची मनोकामना करून त्यांची पूजा संपेस्तोवर घरातल्या सगळ्यांचे आवरून झालेले असे . मग सुरु
व्हायचे वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे व
एकमेकांना “शुभ नब बर्श” म्हणून अभिनंदन करणे. बहुतेक वेळी घरात महाकवी
रबिन्द्रनाथ टागोरांच्या सीडीज लावलेल्या असायच्या आणि “एषो हे बैशाक एषो एषो!” चा आवाज घरात हळुवारपणे
भरून राहायचा.
आता त्या गेल्या आणि त्याच
बरोबर सगळे पूजा पाठही. मी कधीच फारशी
पूजा पाठ करणारी नव्हते , अजूनही नाही. माझा नवराही फारसा त्यातला नाही. त्यामुळे
आता पोईला बैशाक साजरा होतो तो देवापुढे निरांजन – अगरबत्ती लावून व देवाच्या पाया पडून. आणि त्याहीपेक्षा मस्त पेईकी
खावून पिऊन. शेवटी काय – देवपूजेपेक्षा पोट
पूजा खरी. पोट पूजा करण्यासाठी वेगवेगळी
कारणे मिळाली कि झाले! काय म्हणता?
पोईला बैशाकला आमच्याकडे जवळची मित्र मंडळी एकत्र येतात, गप्पा
मारतात आणि हाडाच्या बंगाल्याना हे सगळे करायचे तर खाण्यापिण्याशिवाय शक्यच नाही. पूर्वीच्या काळी या दिवशी बायका लाल काठाची पांढरी
साडी आणि पुरुष मंडळी कुर्ता पायजमा घालायची. अजूनही पुरुष मंडळी ची वेश भूषा
फारशी बदलेली नाही पण आता बायका मात्र केवळ लाल काठाची पांढरी साडीच नेसताना दिसत
नाहीत तर नव्या नव्या प्रकारच्या वेगवेगळ्या
साड्या नेसताना दिसतात. सुंदर सुंदर सलवार कुडते ही बरेचदा बघायला मिळतात.
या दिवसाचा स्पेशल स्वयंपाक ही मात्र माझी जबाबदारी – तेव्हा ही होती , अजूनही
आहे. मेनू ठरवण्यासाठी कितीदा तरी चर्चा होतात आमच्याकडे. कोणत्या तरी वैश्विक महत्वाच्या
गोष्टीवर करावी तशी तावातावाने पण अतिशय मनापासून होणाऱ्या या चर्चाचे मुद्दे ही
तितकेच महत्वाचे असतात बरे ! म्हणजे - माछ भाजा कि माछएर चाप ? .......भापा एलिश ना
दोई माछ? ......ना कि चीन्ग्डी मलाई करी? ........कोशा माग्शो ना चीकेन? .........निरामिशे
– म्हणजे वेजीतेरीयन साठी काय? ( अर्थात
माझ्यासारखे एक दोन अपवाद सोडले तर बंगाली वेजिटेरीअन मिळणे कठीणच! ) मग
त्यांच्यासाठी आलुदम ना कि पोटोल पोस्तो ना कि छानार दालना ? ........ छोलार दाल नारकोल
दिये कोरा होबे ना कि मूग दाल? आर भाजा ते
कि? – बेईगुनी ना कि झुर्झुरे आलू भाजा? ......आमेर टोक ना कि टोमटो – खजुरेर चटनी?
........ मिष्टीते कि? (गोड काय?)..........माल्पोवा ना कि रशमालाई? लुची ( पुरी) नई?
........पुलाव होबे ना?
बऱ्याच चर्चा , वाद –
प्रतिवाद यानंतर शेवटी आमचा या पोईला
बैशाक चा मेनू ठरला आहे. त्यासाठी तयारी ही सुरु झालीय. तुम्हाला ही पोईला बैशाक च्या
निमित्ताने पोट पूजेचे नवीन प्रकार शिकायचे असतील तर काही अडचण नाही येऊ नये यासाठी तर हा प्रयत्न.
भापा इलिश
मेनूत भापा इलीश असावा कि
नाही यावर वर साधारणतः बंगाली लोकांत दुमत होत नाही. भले इलीश कोणता आवडतो –
म्हणजे- कोलाघाटचा कि गंगा नदीतला कि आणखी कुठचा यावर त्यांची मते वेगवेगळी असू
शकतात. इलीशला खूप बारीक बारीक काटे असल्यामुळे सर्वांनाच ( नॉन बंगाली ) तो नीट खाणे
जमेल असे नाही. शिवाय मोहरीचा स्वाद ही कित्येकांना खूप उग्र वाटू शकेल. पण एकदा
तरी मासे आवडणाऱ्या लोकांनी ही आल टाइम फेवरीट बंगाली डेलिकसी ट्राय करायला हरकत
नाही.
हिलसा (इलीश)–
४/५ तुकडे ( गंगा नदीतला मिळाला तर सर्वात उत्तम !)
मोहरीची डाळ – ४ – ५ मोठे चमचे / सन राइज रेडीमेड पावडर –
२ चमचे
हिरवी मिरची
– २/३ (तिखटाच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमीजास्त करावे.)
खसखस – १ छोटा
चमचा ( वाटले तर)
मोहरीचे (सरसो)
तेल – २/३ छोटे चमचे
हळद – १/२ मोठा
चमचा
मीठ –
चवीनुसार
कृती:
हिलसा
माशाचे ४/५ तुकडे (पोटाकडचे) धुवून घ्यावे. हळद मीठ लावून ठेवावे. मोहरीची डाळ (साल
काढलेली) खसखस , हिरवी मिरची, हळद, मीठ मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात
माशाचे तुकडे घेऊन त्याला हे वाटण लावावे. (जर सन राइज रेडीमेड पावडर मिळाली तर काम
खुपच सोपे होईल.) वरून मोहरीचे तेल सोडावे. फोईल लावून कुकरमध्ये ठेवावे. भांड्यावर झाकण ठेवावे.
नाहीतर पाणी शिरेल. एका शिट्टीत बंद करावे. गरम भाताबरोबर सर्व्ह करावे.
यातला
कच्च्या मोहरीच्या तेलाचा वास आणि वाटणाचा घशात लागणारा स्वाद यासाठी बंगाली लोक
वेडे होतात .
ही डाळ म्हणजे वेजिटेरीअन लोकांसाठी
स्पेशल ट्रीट! लग्न, पूजा, नव वर्ष अशा महत्वाच्या प्रसंगी ही डाळ हमखास हवीच. मला
तर मुळात खोबरे आवडते – त्यात तूप आणि गरम मसाल्याच्या वासाने मन कसे तृप्त होते. सुक्या
लाल मिरच्यांचा वास पण मस्त वाटतो. माझ्या आवडीच्या बंगाली पदार्थांपैकी हा एक
नक्कीच. पण जरा जपून. कधी कधी पचायला कदाचित थोडा कठीण होऊ शकतो.
हरबरा डाळ – १ वाटी
ओल्या
नारळाचे पातळ काप – १/४ वाटी
अख्खा गरम
मसाला – ३-४ लवंग, १/२ इंच दालचिनी ,२-३ तमालपत्र
इलायची पूड –
१ छोटा चमचा
साजूक तूप –
२ चमचे
जिरा – १
चमचा
लाल मिरची –
२/ ३
हळद – १/४
चमचा
साखर – १ मोठा
चमचा
मीठ –
चवीनुसार
काजू /
किसमिस/ बदामाचे काप – आवडीनुसार
कृती: